ऋजुता दिवेकरने आपले “चाकोरी बाहेरच्या” करियरला व्यवसायाचे रूप कसे दिले

जेव्हा आपण अन्नाविषयी विचार करतो तेव्हा, तत्काळ आपल्याला बरेच शोध आणि सिद्धांत आठवू लागतात. प्राचीन आणि जागतिक खाद्य संस्कृतींमध्ये अडकल्यामुळे गोंधळलेल्या या जगात कोणतीही व्यक्ती जेव्हा सत्य परिस्थिती आहे तशीच मांडते तेव्हा हायसे वाटते.

अश्याच व्यक्तींपैकी एक आहे सेलिब्रिटी न्युट्रीशनीस्ट ऋजुता दिवेकर, जी जेवणाबद्दलच्या सर्व दंतकथा खोडून काढते आणि तुम्हाला तुमच्या उगमाकडे जायला सांगते. आम्हाला तिच्या व्यवसायाबद्दल, तिने तोंड दिलेल्या आव्हानांबद्दल आणि तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल ऐकण्याची संधी मिळाली.

तुम्हाला गर्भावस्थेवर पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली? तुम्हाला भेटलेल्या महिलांच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल तुम्ही काही सांगू शकता का?

ठळक शब्दात सांगायचे तर, करीनामुळे हे पुस्तक लिहिण्यास प्रेरणा मिळाली. हे पुस्तक लिहिण्यामागचे कारण आहे, तिची गर्भावस्था आणि वजन कमी करण्याबाबतचा तिचा हट्टखोरपणा. शिवाय, भारतीय दृष्टीकोनातून पाहता गर्भावस्था ही एक अशी कथा असते जी सर्वांनाच सांगावीशी वाटते. आपल्याकडे आईकडून मुलींना परंपरागत रित्या मिळालेल्या त्रैमासिक पाककृतींचा शाश्वत असा वारसा आहे आणि या पुस्तकामध्ये अश्या अनेक पाककृती वाचायला मिळतील. गर्भावस्थेच्या प्रत्येक टप्प्यासाठी आणि प्रसूती झाल्यानंतरही आवश्यक अश्या आहार योजना, व्यायाम पद्धती आणि सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न आहेत.

एका विनम्र मध्यमवर्गीय कुटुंबापासून ते उद्योजिका बनण्यापर्यंत – अशी कुठली शिकवण आहे जी तुमच्यासोबत कायम राहिली आहे?

सुरवातीपासुन सांगायचे तर, माझी कथा एक सामान्य मुंबईकरांप्रमाणेच आहे. तुम्ही मुंबईच्या रस्त्यावरील कोणत्याही एका व्यक्तीची निवड कराल तर तुम्हाला आढळेल की त्याचे आयुष्य देखील असेच आहे - मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड. इथे राहून तुम्हाला एक मोठी शिकवण मिळते (ज्याला व्यवहारज्ञान देखील म्हणतात) ती म्हणजे, जर तुमच्या खिशात पैसे नसतील तर बिनधास्त राहू नका आणि जर तुमच्या खिशात पैसे असतील तर हे गंभीरपणे घेऊ नका.  

नाव, प्रसिद्धी आणि यश हे जरी चंचल असले तरीही कार्य चंचल नसते. कार्य नेहमी स्थिर असते, आणि जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता आणि जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही हे सर्व केले आहे तेव्हा सुद्धा केवळ हीच बाब महत्वाची असते.

हे झेनच्या म्हणीनुसार आहे – समजण्यापूर्वी लाकूड तोडा आणि पाणी काढा. समजल्यानंतर लाकूड तोडा आणि पाणी काढा. काम करणे महत्वाचे आहे आणि नाम नाही

ज्या जगात सर्वांना इंजिनीअर, डॉक्टर आणि टीचर बनावेसे वाटते तिथे तुम्ही न्युट्रीशीनीस्ट बनायचे कसे ठरवले?

भारतीय समाजात, आपल्याकडे नैसर्गिकपणे नाकारण्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही जेव्हा दुसरी किंवा तिसरीत शिकत असता, तुमचे पालक आणि तुमच्या आजूबाजूचे लोक ठरवतात की तुम्ही इतके बुद्धिमान नाहीत (शालेय परीक्षेत पुरेसे मार्क न आणू शकल्यामुळे) की तुम्ही एखादे चांगले क्षेत्र जसे की डॉक्टर किंवा इंजिनीअर, निवडू शकता. तुम्ही तर सरासरी पेक्षाही जास्त मार्क नाही आणू शकत त्यामुळे तुम्ही शिक्षक, बँकर इत्यादी सुद्धा नाही बनू शकत.

त्यामुळे वयाच्या अगदी सुरवातीच्या काळातच तुम्हाला समजते की तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आहे, तुम्ही फक्त तेच काम करू शकता ज्यामध्ये तुम्हाला काही अर्थ किंवा उद्देश्य सापडतो. एका अर्थी, सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी गुण मिळवणारा विद्यार्थी असणे हा खूप मोठा आशीर्वाद आहे, कारण तुम्ही स्वतःचा मार्ग शोधू शकता, तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी धैर्य मिळते आणि अजून एक फायदा हा असतो की कुटुंबाचा किंवा समाजाचा तुमच्यावर दबाव नसतो कारण त्यांना तुमच्याकडून यशाची अपेक्षाच नसते.

फिटनेस, हे खरोखरच माझे क्षेत्र आहे. मला या क्षेत्रातील सर्व काही आवडते - लोक, त्यांचा प्रवास, जिम, घाम, इतर लोकांनी मला येडा समजणे, एक असा पदाक्रम जिथे तुमच्या योग्य सल्ल्यावर सामान्य लोक, योग्य सल्ला न देणारे काही डॉक्टर, बातम्यांचे मथळे किंवा कीटी पार्टी करणाऱ्या आंटी सर्वजण शंका उपस्थितीत करतात. तुम्ही जर बघितले तर ती संधी देणारी सोन्याची खाण आहे, अशी जिथे तुम्ही योग्य कार्य केले तर स्वतःचा ठसा उमटवू शकता.

तुमच्या आयुष्यातील समर्थन देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या महिलांविषयी आम्हाला सांगा.

जर तुम्ही माझ्या १० वर्षाच्या भाच्याला विचारले, तर तो तुम्हाला सांगेल की प्रत्येक मुलाच्या आत एक मुलगी असते आणि प्रत्येक मुलीच्या आत एक मुलगा असतो. माझ्या प्रवासात मला माझ्या आयुष्यातील अनेक व्यक्तींनी मदत केली आहे परंतु सर्वात जास्त मदत माझ्या ग्राहकांनी केली. करीना, जिने मला शिकवले की बऱ्याचदा प्रशंसा टीकेच्या स्वरुपात आपल्या समोर येतात. अनिल अंबानी, ज्याने मला शिकवले की कोणतेही कार्य पूर्ण करायचे असल्यास एकच मार्ग आहे तो म्हणजे वेळेआधी योजना तयार करणे - त्यामुळे, कार्य करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला केवळ ती योजना अमलात आणायची असते आणि काम चांगल्याप्रकारे न करण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही सबब नसते. लाली धवन, जी १९९९-२००० मध्ये मला माझ्या फिल्ममध्ये काम करणाऱ्या ग्राहकांना काय संदेश पाठवू ते सांगत असे, की ज्यामुळे माझ्या बोलण्याचा स्वर योग्य असेल, माझे काम पूर्ण होईल आणि मी परिपूर्ण व्यवसायिक वाटेन.

त्याशिवाय अश्या अगणित स्त्रिया आहेत, ज्या आमच्या पूर्वी येऊन गेल्या आणि ज्यांनी समाजाच्या क्रोधाचा सामना केला ज्यांच्या मुळे आज आपण शाळेत जाऊ शकतो, करियर बनवू शकतो, पैसे कमवू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःचे जीवन जगू शकतो. रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले आणि इतर अनेक स्त्री-पुरुष ज्यांनी समाजात ऐक्य आणण्यासाठी खूप परिश्रम केले.

त्यांच्या शिवाय, आज आपण महिला जे स्वांतत्र्य उपभोगतो ते कधीही मिळाले नसते. आणि म्हणूनच, समाज व देश या नात्याने आपण खात्री करून घेतली पाहिजे की आपण या महान लोकांना विसरणार नाही, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि महिला तसेच मुलींच्या भ्रूणाला आपल्या देशात सुरक्षा मिळवून देण्यासाठी शिक्षण किंवा कायद्याच्या सहाय्याने जे काही करता येईल ते आपण अवश्य करू.

महिला उद्योजक म्हणून तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागते का? तुम्ही यातून कश्या प्रकारे मार्ग काढता?

प्रामाणिकपणे सांगायचे तर मुळीच नाही. २००९ मध्ये, मी अमेरिकेतील लास वेगास मध्ये ‘विमेन इन फिटनेस’ च्या मिटिंगसाठी गेले होते. आणि चर्चा चालू असताना मधेच स्पीकरने माझ्याकडे पहिले आणि सांगितले की इथे येऊन तुंम्ही ज्या अडचणींचा सामना केला आहे त्याविषयी सर्वांना सांगा. तिथे केवळ मीच एक भारतीय होती आणि सावळ्या वर्णाची होती. त्यांना वाटले की मी एका विकसनशील देशातून आली असल्यामुळे मला अनेक सामाजिक नियमांच्या विरुद्ध जावे लागले असेल, पण मी सुद्धा त्यांची निराशा केली.

केवळ एक महिला म्हणून मला कोणत्याही विशेष आव्हानाला सामोरे जावे लागले नाही, केवळ मी महिला आहे म्हणून कोणी माझा सल्ला कमी गंभीरपणे घेतला नाही, मी महिला आहे म्हणून कोणी मला कमी पैसे दिले नाहीत. पण त्या दिवशी वेगास मध्ये मला समजले की, फिटनेसच्या क्षेत्रात ही एक विसंगती होती. तथाकथित विकसित देशात राहणाऱ्या महिलांना त्यांचे बोलणे ऐकले जावे यासाठी आणि त्यांना गंभीरपणे घेतले जावे यासाठी खूप कठीण लढाई लढावी लागते. अगदी अलीकडेच, एक बातमी आली होती की अमेरिकेतील व्यवसाय करणाऱ्या दोन मुली, त्यांना गंभीरपणे घेतले जावे यासाठी त्यांच्या कामाच्या इमेल्स वर पुरुष म्हणून साईन अप करतात. यावरून असे सिद्ध होते की तिथे अजूनही फारसा बदल झालेला नाही.

मला सामना करावी लागलेली आव्हाने विशेषतः व्यवसायाशी निगडीत होती, लोकांना कसे समजवावे की मी जे करते आहे त्याला किंमत आहे, मी जो सल्ला किंवा शिफारस देते त्याला आधुनिक फिटनेस आणि न्युट्रिशन विज्ञानाचा आधार आहे (आणि म्हणून वजन कमी करणे, अन्न किंवा औषध उद्योगाच्या मतप्रचारापासून वेगळे वाटतात), मी विकत घेतलेल्या घराचे ईएमआय भरण्यासाठी पुरेसे पैसे कसे कमवावेत, ट्राफिक असताना देखील वेळेवर पोहचण्यासाठी ग्राहकांचा ताळमेळ कसा बसवायचा इत्यादी.

तुम्हाला असे वाटते का की उद्योजक म्हणून महिलांना फारसे गांभीर्याने घेतले जात नाही?

नाही. पण लोक म्हणतात याचे कारण कदचित मुंबई शहर आहे जिथे मी आत्मविश्वासाने नाही म्हणू शकते. इथले आमचे मूळ रहिवाशी आहेत कोळी आणि इथे राहणाऱ्या सर्वांना (विशेषतः लोकल ट्रेनने प्रवास करण्याऱ्या लोकांना) माहित आहे की त्यांच्या बायका व्यवसाय चालवतात, पैसे सांभाळतात, खूप सारे सोने वापरतात. जर तुम्ही एखाद्या कोळी महिलेची चैन चोरायचा प्रयत्न कराल तर ती सहजपणे तुम्हाला बेदम चोप देईल. म्हणून एका तऱ्हेने, महिला आणि पैसे किंवा महिला आणि शक्ती हे सर्वसामान्यपणे मान्य आहे, आणि हे खूप छान आहे.

समस्या केवळ ही आहे की मुख्य प्रवाहापेक्षा वेगळे व्यवसाय, जसा की माझा व्यवसाय, यांना गांभीर्याने घेतले जात नाही. परंतु ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि हे मान्य न केल्यास मी मूर्ख ठरेन. पण होय, कोणालाही या वेगळ्या व्यवसायाला आर्थिक पाठिंबा द्यायचा नव्हता त्यामुळे संघर्ष करावा लागला. २००४ मध्ये माझे जिम खोलण्यासाठी मी घेतलेले ५ लाखाचे कर्ज मंजूर होण्यासाठी ४५ दिवस लागले, आणि ते सुद्धा सर्व कागदपत्रे असताना आणि २० लाखाचा फ्लॅट तारण म्हणून असताना. आज जरी अनेक जण फिटनेसच्या क्षेत्राला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजत असले तरीही असे अनेक व्यवसाय आहेत जे उद्योगांच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वित्तीय सहाय्य मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

आणि मग शीरोज आहे, तुमच्यासारख्या मुख्यप्रवाहात असणाऱ्या वेबसाईट आहेत ज्या उद्योजकांना बोलवतात, महिला उद्योजकांना. असे वाटते की महिलांनी कोणत्यातरी मार्गाने ती पदवी मिळवली आहे जी केवळ पुरुषांसाठीच होती. म्हणजे नकळतपणे आपण सर्वच जण तो खेळ खेळत असतो आणि आपल्याला हा खेळ थांबवला पाहिजे. (नोंद घेतली आहे!) आता तृतीय लिंग सदस्य सुद्धा आले आहे, उद्या कदाचित चौथे येईल आणि कुणास ठावूक पाचवे सुद्धा येईल. स्कॉटलंड आधीच सर्व लिंगीय बाथरूम बनवत आहे आणि आता वेळ आली आहे की आपण समजून घेतले पाहिजे की लोक लोकच असतात, लिंग, जाती किंवा धर्म इत्यादी नसतात.  

तुम्ही कार्य आणि वैयक्तिक जीवनात समतोल कश्या प्रकारे साधता?

जराही प्रयत्न न करता. माझे काम माझे वैयक्तिक जीवन आहे आणि माझे वैयक्तिक जीवन माझे काम आहे. मी दोघांमध्ये जराही भेद मानत नाही. या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये नैसर्गिकरित्या गुंतलेल्या आहेत आणि त्यांचे संतुलन साधणे या गोष्टीला आपण उगाचच खूप महत्व देतो. मी माझ्या कुटुंबातील नोकरी करणाऱ्या चौथ्या पिढीची महिला आहे, माझ्या आईने निवृत्ती घेण्यापूर्वी ३५ वर्षे नोकरी केली आणि आता ६० वर्षे वय असताना तिने स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र या विषयावर वक्ता म्हणून करियर केले आहे. माझ्या घरातील अनेक महिला बीएमसी मध्ये शिक्षिका आहेत - त्या मतदान बूथवर काम करतात, दारोदारी जाऊन सर्वेक्षण करतात, पोलिओ लसीकरण दिवस असला तर सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करतात, इत्यादी.

एक कुटुंब म्हणून आम्हाला त्यांची आठवण येत नाही, त्या शालेय तासांच्या व्यतिरिक्त जी बाहेरची कामे करतात त्या बद्दल आम्हाला अभिमान आहे. अश्या कुटुंबात वाढताना सुरक्षिततेची भावना निर्माण होते जिथे  गरम जेवण बनवण्यासाठी आणि वाढण्यासाठी स्त्रीची आठवण काढली जात नाही. उलट ती जगासाठी काहीतरी उत्तम काम करून आल्यानंतर तिच्यासाठी गरम जेवण आणि गरम चहा तयार ठेवला जातो.

आता हे पुरुषांवर आणि समाजावर अवलंबून आहे की ते कोणते पाउल उचलतात. आपल्याकडे महिलांना सहाय्य आणि आनंद देण्याची क्षमता आहे का? का आपल्याला अश्या प्रकारे घडवले गेले आहे की आपण महिलांचे प्रत्येक स्वप्नांचा प्रतिकार करणार आहोत?

असे कोणते वचन आहे ज्यानुसार तुम्ही आयुष्य जगता ?

सत्यम् वाचा, धर्मामचार – सत्य बोला आणि तुमच्या धर्म किंवा तत्वा नुसार जगा. मी तरी निदान दररोज याच सूत्रानुसार जगते.

असा कोणता ‘आरोग्यदायी’ सल्ला आहे जो महिलांनी पाळला पाहिजे?

स्थानिक जेवण जेवा, जागतिक विचार करा.

गर्भधारणे विषयी बोलयचे तर, मुलांचा विचार करण्यास कोणती वेळ ‘योग्य’ आहे? तुमचे काय मत आहे.

तुम्हाला मुले केव्हा झाली पाहिजे किंवा तुम्ही लग्न केव्हा केले पाहिजे यासाठी योग्य वेळ ती आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचे ऐकता, एखाद्या बद्दलचा संदर्भ किंवा सामाजिक अपेक्षा यांना बळी न पडता.

जाता-जाता महिलांसाठी त्यांच्या आयुष्याचा # टेकचार्ज  यासाठी काही टिप्स?

अब नहीं, तो कब? जर आता नाही तर कधी? आपल्या अटींनुसार जीवन जगण्यास उशीर झालेला नाही. तुमच्या वडील, भाऊ, नवरा किंवा मुलाने ठरवलेल्या निवडीपेक्षा तुम्ही स्वतः केलेल्या निवडीचे परिणाम जास्त सुसह्य असतात.

गरोदरपणातील आहारविषयक टिप्स आणि इतर अनेक माहिती मिळवण्यासाठी, ऋजुता दिवेकर यांचे नवीन पुस्तक ‘प्रेग्नंन्सी नोट्स’ हे पुस्तक वाचा जे दुकानात आणि ऑनलाईन उपलब्ध आहे.  ऋजुता ५ सर्वोत्कृष्ट विक्री झालेल्या पुस्तकांची लेखिका आहे आणि सोशल मिडियावर त्यांचे अनेक चाहते आहेत.

खालील कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या गरोदरपणातील गोष्टी शेअर करा, आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल!


Dhara Joshi

Share the Article :